झोप | |
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com) शुक्रवार, 25 मार्च 2016 - 03:21 PM IST | |
शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही केव्हाही नुकसानच करते. चुकीच्या वेळेला झोपण्याच्या लागलेल्या सवयीने निद्रादेवी रुष्ट होऊन झोपेचे चक्र बिघडते व अनेक लहान-मोठे आजार होतात. म्हणून झोप ही योग्य प्रमाणात व योग्य वेळेला घ्यावी. चुकीच्या वेळी म्हणजे दिवसा झोपण्याने व रात्री जागण्याने नुकसानच होते.
पहा विश्रांतीचा एक उत्तम उपाय आहे हे सर्वांनाच पटेल. शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते.
शांत झोप ही शारीरिक उत्साह, स्मृती, सर्जनशीलता आणि समृद्धिप्रदायक असते. प्रत्येकाचे झोपेचे प्रमाण कम-अिधिक असू शकते. परंतु झोपण्याची वेळ ही दिवस-रात्रीच्या समयचक्रावरच अवलंबून असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही केव्हाही नुकसानच करते. चुकीच्या वेळेला झोपण्याच्या लागलेल्या सवयीने निद्रादेवी रुष्ट होऊन झोपेचे चक्र बिघडते व अनेक लहान-मोठे आजार होतात. म्हणून झोप ही योग्य प्रमाणात व योग्य वेळेला घ्यावी. चुकीच्या वेळी म्हणजे दिवसा झोपण्याने व रात्री जागण्याने नुकसानच होते हे पुढील सूत्रावरून समजू शकेल,
अकालशयनात् मोह-ज्वर-स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्-शोफ-हृल्लास-स्रोतोरोधाग्निमन्दता भवन्ति ।
विचारात गोंधळ निर्माण होतात, अंग जखडल्यासारखे वाटते, सर्दी, डोकेदुखी, सूज, मळमळ, ताप, अंग जड होणे, अग्नी मंद होणे वगैरे त्रास होतात.
अहितनिद्रया हलीमक-शिरोजाड्यस्तैमित्य-मतिभ्रंश-शोफ-अरोचकार्धावभेदक-कण्डु रुक्कोठ पिटिका-कास-गलामथ विषवेगप्रवृत्तयश्च भवन्ति । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान यकृताचे कार्य मंदावते, डोके जड होते, शरीर थिजल्यासारखे वाटते, बुद्धी भ्रष्ट होते, अंगावर सूज येते, तोंडाची रुची नाहीशी होते, अर्धे डोके दुखते, अंगाला खाज सुटते, अंग दुखते, अंगावर गांधी येतात, पुटकुळ्या उठतात, खोकला व गळ्याचे रोग होऊ शकतात, विषाचा जोर वाढतो. म्हणून वेळेवर आणि योग्य प्रमाणात झोपणेच चांगले.
बऱ्याच जणांना, विशेषतः गृहिणींना, दुपारचे जेवण झाले की झोपण्याची सवय असते. विश्रांती घेण्यासाठी दुपारी वामकुक्षी करण्याचा प्रघात असला, तरी वामकुक्षी आणि अंथरुणावर पूर्णपणे आडवे होऊन गाढ झोपणे यात मोठा फरक आहे. ‘वाम’ म्हणजे ‘डावी’ व ‘कुक्षी’ म्हणजे ‘कुशी’. दुपारी जेवल्यानंतर डाव्या अंगावर आडवे होणे म्हणजे ‘वामकुक्षी’ होय. दुपारच्या जेवणानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटे डाव्या कुशीवर पडल्यास पचनाच्या क्रियेला मदत होते. खाल्लेले अन्न सर्वप्रथम जेथे साठते, त्याला आमाशय किंवा जठर म्हणतात व ते डाव्या बाजूला असते. पचनाची प्रथम प्रक्रिया म्हणजे अन्न एकजीव करणे, कडक अन्नपदार्थ बारीक करणे व कफाच्या साह्याने अन्नाचे मधुर रसात रूपांतर करणे या गोष्टी इथे होत असतात. डाव्या कुशीवर झोपल्याने जठराला खालून आधार मिळतो व या क्रिया सहज होऊ शकतात.
नुसत्या वामकुक्षीमुळे पुरेशी विश्रांती मिळाली नाही असे वाटले तर आरामखुर्चीत बसून बसल्या बसल्या एखादी डुलकी घेण्यास हरकत नाही, मात्र दुपारी गाढ झोपण्याची सवय वजन वाढणे, सुस्ती येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे, वारंवार सर्दी-खोकला होणे अशा अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकते.
झोप कधी घेतली यावरून तिचे चार प्रकार पडतात,
अकाली घेतलेली झोप
रात्री ११ ते ६ या वेळेखेरीज घेतलेली झोप आज ना उद्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. झोप यायला कारणीभूत कफदोष तर झोपेतून जागे व्हायला वातदोष कारणीभूत असतो. सकाळी सहा वाजेपर्यंत वाताचा काळ असतो त्यामुळे या काळात जाग येणे, झोपेतून उठणे सोपे असते. एकदा का कफाचा काळ सुरू झाला, विशेषतः आठ-साडेआठ वाजता कफाधिक्याच्या काळात उठणे अवघड जाते व नंतर दिवसभरही कफाचा जडपणा जाणवू शकतो. तसेच रात्रीही कफाच्या काळात म्हणजे १०-११ वाजेपर्यंत झोपणे चांगले.
शांत झोपेसाठी...
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शांत झोपेसाठी पुढील उपाय
सुचवता येतील.
- जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.
- पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.
- ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.
- रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.
- नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.
- शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. याच्या नियमित अभ्यासाने झोपेची गोळी घ्यायची लागलेली सवयही सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज, दरबारी, तोडी, भैरवी अशा रागांवर आधारित संगीतरचना ऐकल्याने शांत झोप येण्यास मदत मिळते.
- शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.
अतियोगरूपी झोप
आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात झोपणे हेही रोगांना आमंत्रण देणारे असते. वयाचा विचार करता लहान मुलांना सर्वाधिक झोप लागते. नंतर जसजसे वय वाढत जाईल तसतसे झोपेचे प्रमाण कमी होणेही स्वाभाविक आहे. मात्र उतारवयातही सहा-सात तास शांत झोप लागायलाच हवी. प्रकृतीनुसार विचार केला असता. कफप्रकृतीच्या व्यक्तींना झोप जास्ती येते व प्रियही असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींची झोप त्यामानाने कमी व सावध असते. वातप्रकृतीच्या व्यक्तींना मात्र सर्वांत कमी व तुटक-तुटक झोप येते. खरे तर वातप्रकृतीच्या लोकांना शांत झोपेची खूप आवश्यकता असते.
हीनयोगरूपी झोप
आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेण्याचेही अनेक दुष्परिणाम असतात. कामाचा ताण, अभ्यासाचा भार, प्रवासामुळे वाया जाणारा वेळ वगैरे अनेक कारणांमुळे झोपेला वेळ कमी पडू शकतो. मात्र यामुळेही शरीराचे नुकसानच होत असते.
समयोगरूपी झोप
म्हणजे रात्री आणि वेळेवर घेतलेली झोप. किमान मध्यरात्रीच्या आधी झोपणे आणि सकाळी सूर्योदयाच्या आसपास उठणे हे एकंदर आरोग्यासाठी श्रेयस्कर असते. मात्र बऱ्याच व्यक्तींना झोपायला गेले तरी झोप येत नाही किंवा सुरुवातीला झोप लागली तरी मध्येच जाग, किंवा शांत झोप लागत नाही किंवा इतकी स्वप्ने पडतात की सकाळी उठल्यावर जणू आपण जागेच होतो, असे वाटते. अशा सर्व तक्रारींवर लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक होय.
No comments:
Post a Comment